बोधडी येथे सलूनमध्ये अर्धी दाढीच्या वादातून ग्राहक चिडला वादातून दोघांची खून

प्रतिनिधी / नांदेड – नांदेड जिल्ह्यातील बोधडी येथे दुहेरी खुनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दाढी करण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहक आणि न्हाव्यामध्ये वाद झाला. सलूनमध्ये दाढी करत असताना अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे’, असे म्हणून तगादा लावल्याने झालेल्या वादात सलून चालक आणि ग्राहकामधे वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा चिरून खून केला. या खुनानंतर संतप्त अज्ञात जमावाने सलूनच्या मालकास ठेचून ठार केले तर दोन सलूनचे दुकान व संबंधित सलून मालकाचे घर जाळून खाक केले आहे.सदरील घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी येथील बाजारपेठेत गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडे सहाच्या दरम्यान घडली. बोधडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत अशा एकाच वेळी झालेल्या दुहेरी हत्येमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सलून चालकाने केलेल्या खूनाचा बदला मयताच्या नातेवाईकांनी काही वेळातच घेतला. अशा प्रकारे एका तासाच्या अंतरात बोधडी येथे दोन खून घडले आहेत. व्यंकट सुरेश देवकर वय २२ राहणार बोधडी याचा अनिल मारोती शिंदे या सलून चालकाने क्षुल्लक कारणावरुन खून केला. याचा बदला घेताना मयत व्यंकट सुरेश देवकरच्या नातलगांनी सलून चालक अनिल मारोती शिंदे (वय २७ वर्षे) याचा देखील खून केला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, बोधडी येथे अनिल मारोती शिंदे, (वय २७ वर्षे) या नाभिक समाजाच्या तरुणाची सलूनचे दुकान बोधडी येथील मार्केटमध्ये आहे. या सलूनमध्ये सायंकाळी पाच ते साडेपाच सुमारास याच गावात राहणारा व्यंकटी सुरेश देवकर हा (वय २२ वर्षे) तरुण दाढी करण्यासाठी गेला. दाढी करत असताना अर्धी दाढी झाल्यावर देवकरला शिंदेने दाढीचे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा देवकरने माझी दाढी पूर्ण कर दाढी झाल्यावर पैसे देतो, असे सांगितल्याने दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चक्क अनिलने व्यंकटचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. या खुनाची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. देवकरच्या नातेवाईकांनी जमाव करून प्रथम अनिल मारुती शिंदे या नावाचे सलूनचे दुकान जाळून टाकले आणि त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला गावच्या भर मार्केटमध्ये आणून त्याचा ठेचून खून केला. दरम्यान, त्याचे घर देखील जाळण्यात आले. या घटनेने गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती किनवट पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाची गाडी ही घटनास्थळी पोहचली असून बोधडीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. किनवटचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सध्या बोधडी या गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.