IPL 2021 : RCB चा हिरो UAE त ठरला झिरो!
मुंबई / प्रतिनिधी – क्रिकेट जगतातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजामध्ये ज्याच्या नावाची चर्चा केली जाते त्या मिस्टर 360 डिग्री एबी डिव्हिलियर्सला यंदाच्या आयपीएल हंगामात नावाला साजेसा खेळ करता आला नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात युएईच्या मैदानात त्याने सपशेल गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. एलिमिनेटरच्या महत्त्वपूर्ण लढतीत तो अवघ्या 11 धावा करुन माघारी फिरला. सुनील नारायणने त्याच्या दांड्या उडवल्या. एबी डिव्हिलियर्सचं अपयश हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यामागच्या कारणापैकी एक मोठे कारण आहे.
एबी डिव्हिलियर्सने दुसऱ्या टप्प्यातील आठ सामन्यात केवळ 106 धावा केल्या. त्याची हीच खराब कामगिरी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धही कायम राहिली आणि संघाच्या अडचणीत भर पडली. डिव्हिलियर्स आरसीबीच्या ताफ्यातील मुख्य आधारस्तंभ होता. त्याने अनेकदा हातून निसटलेल्या सामने जिंकून देण्याचा पराक्रमही करुन दाखवला. कित्येक सामने त्याने एकहाती जिंकून दिलेत. पण यावेळी त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पारडे जड मानले जात होते. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवणू दिमाखात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ नेट रनरेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये आला होता. पण या संघाने आपल्यातील क्षमता दाखवून देत रॉयल चॅलेंजर्सचा खेळ खल्लास केला. कोलकाता विरुद्ध एबी डिव्हिलियर्स पाचव्या क्रमांकावर फलंदाडीला आला. मोक्याच्या क्षणी त्याच्या भात्यातून मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल, अशी बंगळुरुच्या चाहत्यांची अपेक्षा होती. पण त्याने घोर निरास केले. आपल्या डावात तो केवळ 1 चौकार मारुन 11 धावांवर माघारी फिरला.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 15 सामन्यात एबीने 14 डावात बॅटिंग करताना 313 धावा केल्या. यात त्याने दोन अर्धशतके झळकावली. 76 ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च खेळी ठरतील. दुसऱ्या टप्प्यात मात्र त्याला समाधानकारक खेळ करता आला नाही. मागील तीन हंगामात त्याने सातत्यपूर्ण 450 पेक्षा अधिक धावा केल्याचे पाहायला मिळाले होते.