काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ उपलब्ध होईल असा अध्यक्ष हवा

0
82

वृत्तसंस्था / नवी दिल्ली – काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झालंय, नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतेय. दरम्यान, सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीची उद्याची बैठक वादळी ठरणार अशी दाट शक्यता दिसतेय. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सुरु असलेला पेच तातडीनं संपवावा अशी मागणी पक्षातूनच व्हावी लागलीय. पक्षातल्या 23 नेत्यांनी त्याबाबत सोनिया गांधी यांना लिहिलेल्या एका पत्राचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचा वाढता विस्तार आणि युवकांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत असून तातडीनं तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा हा पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी तडकाफडकी राजीनामा दिला, त्यानंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष होणार का याची चर्चा सुरु झाली. पण पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींकडेच धुरा आली. पण प्रकृती कारणामुळे या वयात त्या ही जबाबदारी पूर्णपणे पेलू शकत नाहीत. या पत्रात अध्यक्षपद गांधी कुटुंबानंच घ्यावं असा उल्लेख नाही. पण किमान तातडीनं पुढे येऊन ही जबाबदारी उचलावी कारण पक्षाच्या प्रतिमेला तडे जातायत अशी भावना त्यातून दिसतेय.

हे पत्र लिहणारे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरुर यांच्यासह मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, जीतिन प्रसाद, मिलिंद देवरा अशा अनेक नेत्यांचा यात समावेश आहे.

सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पुढच्या काही महिन्यात बिहार, बंगाल आणि नंतर युपी, गुजरातच्या निवडणुका आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा हा पेच फार काळ प्रलंबित ठेवणं पक्षाला परवडणारं नाही. त्यात आता ज्येष्ठांच्या या पत्राचाही दबाव असल्यानं आता अध्यक्षपदाबाबत उद्याच्या वर्किंग कमिटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असेल.

LEAVE A REPLY