‘मिशन आकार’ प्रकल्पात विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन

0
83

प्रतिनिधी / औरंगाबाद- आदिवासी विकास विभाग, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमार्फत  एनइइटी/ आयआयटी-जेइइ/ एमएच-सीइटी सारख्या परीक्षांची तयारी  करुन घेण्याकरीता दोन महिन्याचा निवासी मार्गदर्शन वर्ग आयोजित केला जातो. परंतु यंदा कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन विद्यार्थी हिताकरिता ‘मिशन आकार’ प्रकल्पात ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविली आहे.

आश्रम शाळांमध्ये वर्ग 12 विज्ञानची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना एनइइटी/ आयआयटी-जेइइ/ एमएच-सीइटी सारख्या प्रवेश परीक्षांकरीता शहरी विद्यार्थांप्रमाणे मार्गदर्शन मिळावे म्हणून ‘मिशन आकार’ हा महत्त्वाकांशी प्रकल्प राबविण्यात येतो. नामांकीत वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, याकरिता आदिवासी विकास अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील व आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, नागपुर व आकार गृप ऑफ इंन्स्टिट्युशन्स, हिंगणा, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 जून ते 30 जून 2020 या कालावधीत हा महत्वाकांशी प्रकल्प शासनाचा एकही पैसा खर्च न करता विनामुल्य राबविण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व 12 वी विज्ञानची परीक्षा दिलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांकरिता 10 दिवसाचा ऑनलाइन रिव्हिजन वर्ग आयोजित करण्यात आला होता. सदर 10 दिवसांच्या रिव्हिजन वर्गामध्ये गुगल मीट ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवी, उच्च विद्याविभुषित, प्राध्यापकांनी गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भैतिकशास्त्र विषयांचे ऑनलाइन मार्गदर्शन केले तसेच पीडीएफ स्वरुपात विद्यार्थ्यांना नोट्स पुरविण्यात आल्या.

सदर ऑनलाईन रिव्हिजन वर्गाला गुगल फार्मव्दारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, औरंगाबाद, अकोला येथील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 251 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ऑनलाईन रिव्हिजन वर्गामध्ये आय.आय.टी, मुंबईचे डॉ. आशिष दर्यापुरकर, डॉ. सचिन बोंगावार, डॉ.विरेंद्र सांगोडे, श्रीमती मिनाक्षी, धनराज लांजे, सुष्मा गौतम या तज्ज्ञ प्राध्यपक मंडळींनी मार्गदर्शन केले, अशी माहिती आदिवासी विकास अमरावतीचे अपर आयुक्त  विनोद पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY