जमावबंदीच्या कालावधीत आंदोलन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

प्रतिनिधी / हिंगोली-  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करुन त्‍याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच भारत सरकारच्या आरोग्‍य मंत्रालय आणि महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत थांबणे, चर्चा करणे,आंदोलने करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेवून सर्वसामान्‍य जनता व त्‍यांचे आरोग्‍यास धोका असल्‍याने तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरीता फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 31 जुलै, 2020 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दीमध्ये राहणाऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू केले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील याबाबत जनेतेला विविध माध्यमातून जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आदेशाद्वारे कळविलेले आहे.

परंतू जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असून देखील काही नागरिक सदर आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीररित्या अंदोलन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या अंदोलन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY