प्रतिनिधी / मुंबई – राज्यात विमान सेवा सुरू करण्यास अखेर ठाकरे सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यात विमानांची रोज 25 उड्डाणे आणि 25 लँडिग करण्यास महाराष्ट्र सरकारने सहमती दिली आहे. याअगोदर विमान सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारची तयारी नव्हती. राज्यात विमानांची संख्या हळूहळू वाढवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने रविवारी दिली. या संदर्भात लवकरच नियम व सूचना जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

सोमवारपासून देशातील विमान सेवा सुरू होणार आहे. यासाठी हवाई प्रवासासाठी यूपी, महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल, जम्मू कश्मीर आणि कर्नाटक या राज्यांनी सूचना जारी केल्या आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होम क्वॉरंटाईन राहण्याची अट आहे. ही अट कर्नाटक राज्यात सात दिवसांसाठी तर अन्य राज्यात 14 दिवसांसाठी आहे.

25 मे पासून देशात विमान सेवा सुरू होणार
देशभरात येत्या 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान देशांर्गत हवाई वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करुन सांगितलं की, 25 मे पासून देशांर्तग हवाई वाहतूक सुरु केली जाणार आहे. सर्व विमानतळांना 25 मे पासून सेवा देण्यास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी 15 मे रोजी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) प्रवाशांसाठी काही गाईडलाईन जारी केल्या होत्या. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सहा सूचना केल्या होत्या. ज्यामध्ये ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे, वेब-चेकइन करणे आणि बोर्डिंग पास प्रिंट आउट आणणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY