प्रतिनिधी / पंढरपूर- राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना यंदा आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळे येणार का? हा प्रश्नाकडे संपूर्ण राज्यातील वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून राहिले होते. आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत परंपरा खंडित न करता 10- 12वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळे आणण्याबाबत निर्णय झाला आहे. परंपरा खंडित न करता शासनाने सांगितल्यास पालखीतील वारकऱ्यांची संख्या कमी करून, सांगितल्यास मार्ग बदलू आणि गरज पडल्यास 18 दिवसांचा कालावधी 7 दिवस करण्याबाबतही विचार करण्याची मानकऱ्यांनी भूमिका घेतली असून शासनाने फक्त परंपरा खंडित न करता कोणताही मार्ग दिल्यास आम्ही तो पाळू असा निर्णय करण्यात आल्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी राणा महाराज वासकर यांनी सांगितले.

यावेळी पालखी सोहळ्यातील सर्व विधी सरकार परवानगी देईल तितक्या लोकात परंपरेप्रमाणे केले जाणार असून पालखी प्रवास कुठून करणार आणि मुक्काम कुठे करणार याची माहिती गुपित ठेवली जाणार आहे. पालखी सोबत रिंगणाच्या घोडे वगैरे परंपरागत सर्व प्रथा पाळल्या जाणार असून फक्त यासाठी शासन परवानगी देईल तितक्याच लोकांसह हा सोहळा केला जाणार आहे. यासाठी सोशल डिस्टन्सिंग , मास्क आदिबाबतचे नियम पळाले जाणार असून सोबत एक वैद्यकीय पथकही असणार आहे.

आषाढीची परंपरा अखंडित राहणार, बैठकीत एकमत, पालखी सोहळ्याबाबत सरकारशी चर्चा करणार

या बैठकीत शासनाशी चर्चा करण्यासाठी राणा महाराज वासकर व अजून एकाची निवड करण्यात आली आहे.  13 जूनला पालखी सोहळा सुरू होत आहे. आता याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. यानंतरच मानाच्या सात पालखी सोहळ्यांना आपली भूमिका राज्यभर वारकरी संप्रदायाला सांगावी लागणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आजच्या बैठकीत एकमत झालं आहे. मात्र ही परंपरा अखंडित ठेवताना समाज आणि वारकऱ्यांचे आरोग्य आणि हित विचारात घेतलं जाईल. 13 जूनला पालखी सोहळा सुरू होत आहे. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी असेल हे पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठरवण्यात आलं आहे. याबाबत सरकारशी ही चर्चा केली जाईल. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत जे ठरलंय त्यांचं वारकरी संप्रदायाने पालन करावे, असं आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केलं आहे. तसेच इतर सात पालखी संस्थानांशी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY