17 मेनंतर काय? – सोनिया गांधी यांचे सरकारला सवाल

लॉकडाऊन वाढवण्याचे निकष कोणते?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली – देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन 3 नंतरच्या परिस्थितीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लॉकडाऊन किती काळासाठी ठेवायचा याचे निकष काय आहेत आणि 17 मे नंतर सरकारकडे कोणत्या योजना आहेत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले.

सोनिया गांधी यांनी या बैठकीत कोरोना साथीविरुद्ध लढण्यासाठी सरकारचे प्रयत्न तसंच देशभरात अडकलेले मजूर आणि कामगारांना परत आणण्याबाबतच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा केली. या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि खासदार राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.

छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, पुदुच्चेरी या चार राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तर महाराष्ट्रात कॉंग्रेसचा समावेश असलेले महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे. सोनिया गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांचे आभारही मानले. त्या म्हणाल्या की, “आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आभार मानतो, ज्यांनी अनेक अडचणी असूनही गव्हाचं चांगलं पीक घेऊन अन्न सुरक्षा निश्चित केली.”

17 मे नंतर काय? : सोनिया गांधी
“17 मेनंतर, काय? आणि 17 मेनंतर, कसे? लॉकडाऊन किती काळ सुरु राहील, हे ठरवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते निकष ठरवले आहेत? सरकारकडे लॉकडाऊन 3 नंतर कोणती रणनीती आहे?” असे प्रश्न सोनिया गांधी यांनी बैठकीत उपस्थित केले.

मागील काही दिवसात सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर कार्यशील दिसल्या. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या देशभरातील स्थलांतरित मजुरांना मूळगावी परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करेल, अशी घोषणा सोनिया गांधी यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. परराज्यात अडकलेल्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप रेल्वे आणि सरकारवर झाल्यानंतर सोनिया गांधींनी हे जाहीर केलं होतं. सोनिया गांधींच्या या घोषणेनंतर पक्षाच्या प्रत्येक नेत्याने सरकारवर हल्लाबोल केला. त्याआधी सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. ज्यात कोरोना संकटाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली होती.

LEAVE A REPLY