Tuesday, May 26, 2020

काश्मीरच्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह ५ जवान शहीद

वृत्तसंस्था/जम्मू काश्मीर – संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना दहशतवाद्यांच्या कारवायांना उधाण आले आहे. काश्मीरमध्ये शनिवारपासून झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाल्याचे समजते आहे. यात एक कर्नल, एक मेजर आणि दोन जवानांसह एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरच्या हंदवाड्यात शनिवार दुपारपासून झालेल्या चकमकीत ५ जवानांना वीरमरण आले असून २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज, दोन जवान आणि पोलीस निरीक्षक शकील काझी शाहिद झाले.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान हंदवाडा येथील एका घरात शिरले. याठिकाणी दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी चार भारतीय जवान आणि एक स्थानिक पोलीस आतमध्ये गेले होते. यावेळी त्यांचा इतरांशी संपर्क तुटला. त्यामुळे भारतीय जवान घरातच अडकून पडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. यानंतर आज सकाळी हे चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्वजण घरात शिरल्यानंतर आधीपासूनच तिथे लपून बसलेल्या दहशतवादयांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. मात्र, घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

तत्पूर्वी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात पाकिस्तानकडून शुक्रवारी दुपारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेल्या बेछुट गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

 

LEAVE A REPLY