विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणिकरण समितीची स्थापना

0
105

प्रतिनिधी /हिंगोली- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी MCMC) स्थापना जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.

निवडणूक  कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या सोशल मिडीया, टी.व्ही.चॅनेल, रेडीओ, केबल्स व वर्तमानपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींना परवानगी देणे,एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे समिती  करणार आहे.

समितीमध्ये जिल्‍ह्यातील वसमत मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, कळमनुरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, हिंगोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे,  स्वतंत्र नागरिक म्हणून प्रा. मदन मार्डीकर सदस्य असून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत  सदस्य सचिव आहेत.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज :- टीव्‍ही चॅनेल,  रेडीओ एफएम, आकाशवाणी, प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्‍तपत्रांच्‍या इ-आवृत्‍तीतील (जाहिराती)  सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्‍या दृक-श्राव्य (ऑडिओ-व्‍हिज्‍युअल) जाहिरातींसाठी  प्रसारणपूर्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्‍यासाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज (इंग्रजी किंवा  मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्‍ये आवश्यक माहिती भरुन सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी (सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्‍या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती –  ट्रान्‍सस्‍क्रीप्ट)  जिल्‍हा  माहिती कार्यालय, दुसरा मजला,  मध्‍यवर्ती  प्रशासकीय इमारत,  जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली  (दूरध्‍वनी क्रमांक : 02456-222635) येथील जिल्‍हास्‍तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्‍या कक्षाशी संपर्क साधावा.

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण समितीकडे फक्त उमेदवारांच्या  जाहिरातीचे प्रमाणिकरण करून दिले जाणार आहे. राजकीय पक्षांच्‍या  जाहिराती  राज्‍यस्‍तरावरील समितीकडून प्रमाणित करुन दिल्‍या जातील. त्‍यासाठी मुंबई येथील समितीशी संपर्क साधावा. हिंगोली जिल्‍ह्यातील विधानसभेचे  उमेदवार अथवा त्‍यांचे प्रतिनिधी(प्राधिकृत असलेले) जिल्‍हा समितीकडे अर्ज सादर करु शकतात. त्याप्रमाणेच फक्‍त उमेदवाराच्‍या वैयक्तिक सोशल मिडीयाच्‍या अकाऊंटवरील पोस्ट, फोटो,  व्हिडीओ यांच्‍यासाठी पुर्व प्रमाणिकरण करुन घेण्याची  गरज नाही.

प्रत्‍येक  ऑडिओ  जाहिरात किंवा ऑडिओ-व्‍हिज्‍युअल जाहिरात  स्‍वतंत्र असावी.  एकाच सीडीमध्‍ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नये. अर्जदाराचे पूर्ण नाव,  पत्‍ता,  जाहिरात कोणत्‍या उमेदवारासाठी आहे  त्‍याचे नाव,  पक्षाचे नाव,  जाहिरात कुठे दाखवणार,  जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च,  जाहिरातीतील भाषा यांचा स्पष्ट उल्‍लेख असला पाहिजे.

मान्‍यताप्राप्त राजकीय  पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी तीन  दिवस  आणि  इतर उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी सात  दिवस आगोदर अर्ज करु शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्‍य असावा. इतरांची  बदनामी  करणारा, जाती-जातींमध्‍ये,  धार्मिक  तेढ निर्माण  करणारा नसावा. देशविघातक कृत्‍याला  प्रोत्‍साहन देणारा  नसावा. तसेच मुद्रीत माध्‍यमातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्‍या दिवशी  किंवा  मतदानाच्‍या एक दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  अनिवार्य  आहे.

LEAVE A REPLY