आई-बाबा मतदान करा… शालेय विद्यार्थी पत्राव्दारे घालणार पालकांना साद

0
186

प्रतिनिधी / हिंगोली- आई-बाबा मतदान करा, अशी साद हिंगोली जिल्हा परिषदेच्या सुमारे 900 शाळेतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राव्दारे घालणार आहेत. हे विद्यार्थी आपल्या पालकांकडून संकल्प पत्र ही लिहुन घेणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावा यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्वीप समितीच्या समन्वय अधिकारी रेणुका तम्मलवार यांनी दिली.  हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अभिनव उपक्रमाबाबत चर्चा झाली.

याबाबत जिल्हा परिषदेने माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांनी सांगितले की, हिंगोली जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात सुमारे 900 शाळा आहेत. या शाळांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आपले आई-वडिल त्याचबरोबर मतदानास पात्र असणारे भाऊ बहिण आणि इतर, नातेवाईक यांना पत्र लिहून मतदान करण्याची साद घालणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व कळेल.

तीनही मतदारसंघात महिला आणि युवक युवतींचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महिला बचत गट, कृषी सखी, बँक सखी यांच्या सहाय्याने महिला मतदारांची जागृती केली जाणार आहे. कारण कुटूंबातील महिलांनी मतदान केले तर सर्वच सदस्य मतदानास प्रोत्साहित होतात, असे श्रीमती तम्मलवार म्हणाल्या.

जिल्हा परिषदेच्या शाळांत चुनाव पाठशाला उपक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही श्री. जयवंशी यांनी दिल्या आहेत. यानुसार जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदांच्या शाळांतून चुनाव पाठशाला उपक्रम आयोजित केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया आणि मतदानाचे महत्व कळेल, असे श्री. पावसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY