वृत्तसंस्था /एकतारिनबर्ग, रशिया – भारताचा युवा आंतरराष्ट्रीय बॉक्सर अमित पंघलने आज भागतीय बॉक्सिंगच्या इतिहासात नवा अध्याय रचला. त्याने जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा आणि रौप्यपदक मिळविणारा अमित पहिला भारतीय बॉक्सर ठरला.
याअगोदर भारताच्या विजेंदर सिंह, विकास कृष्णन, शिव थापा आणि गौरव बिदुडी यांनी या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. या सर्वांना मागे टाकून अमितने रौप्यपदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला.
52 किलो वजनी गटात दुसरे मानांकन देण्यात आलेल्या अमितला रियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झोयरोवकडून निर्णायक सामन्यात हार खावी लागली. झोयोरोवने हा सामना 5-0 गुणांनी सहज जिंकला. त्याने सुरुवातीपासून जोरदार आक्रमक खेळ करून अमितला विजयाची फारशी संधी दिली नाही.
या लढतीत अमितने झोयोरोवला जोरदार झुंज दिली. पहिल्या फेरीत झोयोरोवने आक्रमक खेळ करून महत्त्वाचे गुण मिळविले. दुसर्‍या फेरीत अमितने त्याचा जोरदार मुकाबला करून गुण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. आक्रमक खेळासाठी झोयोरोवची ख्याती आहे. 2017 मध्ये आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकून अमित प्रकाशात आला. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत सातत्याने चांगली कामगिरी करून त्याने आपला आलेख सतत उंचावत ठेवला. यंदाच्या वर्षात 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणार्‍या अमितचे हे कारकिर्दीतील सर्वात मोलाचे जागतिक स्पर्धेतील पदक ठरले.

LEAVE A REPLY