नगरमध्ये कचरा डेपोला भीषण आग

प्रतिनिधी / पुणे – सावेडी येथील कचरा डेपोला आज सायंकाळी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीनं काही क्षणातच रौद्ररुप धारण केल्याने येथील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सावेडी कचरा डेपोमध्ये रोज साधारण १०० ते १२५ टन कचरा गोळा होतो. सोमवारी सायंकाळी या कचरा डेपोला अचानक आग लागल्याने या परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला. कचरा असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. त्यातच वारे वाहत असल्यानेही आग भराभर पसरली आणि आगीचं एकच तांडव निर्माण झालं. काही वेळातच आगीचे लोळ आणि धुरामुळे या परिसरातील तापमानात वाढ झाली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह सावेडी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अज्ञात व्यक्तीने या भागातील कचरा पेटवून दिल्याची शक्यताही अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सावेडी येथील कचरा डेपोला आग लागल्यामुळे पुन्हा एकदा येथील कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आग लागताच राहुरी, देवळाली प्रवरा, एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मागील वर्षीही लागली होती आग
सावेडी येथील कचरा डेपोला मागील वर्षी (२०१८ मध्ये) मे महिन्यातच भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला तब्बल सात ते आठ तासांचा कालावधी लागला होता. आगीच्या घटनेनंतर देखील तीन ते चार दिवस धुराचे लोट या कचरा डेपोतून निघत होते. या धुराचा सावेडी उपनगरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता.

शेतकऱ्यांचा संताप
या डेपो शेजारीच अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. आगीची झळ त्यांनाही बसते. शिवाय कचरा डेपोचा त्रासही त्यांना होता. त्यामुळे आग लागल्याचे समजातच परिसरातील शेतकरी तेथे आले. त्यांच्या भावना संतप्त होत्या. त्यांनी आग विझविण्याचे काम काही काळ बंद पाडले. एकदाचे काय ते होऊन जाऊ द्या, पुन्हा पुन्हा त्रास नको, अशी त्यांची भूमिका होती. आगीने आणि कचऱ्याच्या धुळीने जे नुकसान होते, त्याची भरपाई आम्हाला मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. त्यानंतर काही अधिकारी आणि नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यावर शेतकऱ्यांचा विरोध मावळला आणि आग विझविण्याचे काम सुरू झाले.

LEAVE A REPLY