‘मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि…’, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली – राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.  नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की…’असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी देश-परदेशातून तब्बल 8 हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख उपस्थित होते. शिवाय, सिनेसृष्टीतील तारे-तारकांनीही सोहळ्याला हजेरी लावली. संध्याकाळी जवळपास 7 वाजता सुरू झालेल्या शपथविधी सोहळ्याची सांगता रात्री 8.05 वाजता करण्यात आली. या सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य दिग्गजही उपस्थित होते.

ममता बॅनर्जी गैरहजर-

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता. ‘शपथविधीला हजर राहणार होतो. पण प्रसारमाध्यमांतील वृत्ताद्वारे शपथविधी सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण दिल्याचं समजलं. या हत्यांना तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आल्यानं आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला’, असे ममता बॅनर्जींनी सांगितलं

LEAVE A REPLY