शासकीय कामकाज करताना मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी राजयोग आवश्यक -ब्रह्माकुमारी अनितादिदी

0
433

प्रतिनिधी / हिंगोली-  आज सेनगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज वैद्यकीय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास प्रशिक्षण कार्यशाळेचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत उपस्थितांनी मेडिटेशनद्वारे  गहनशांतीचा अनुभव करुन दैनंदिन जीवनातील धावपळीपासून काही क्षण का असेना तणावमुक्तीचा अनुभव घेतला.

या प्रशिक्षण कार्यशाळेच्या प्रास्ताविकात ब्रह्माकुमारी अनितादीदी म्हणाल्या की, हल्लीच्या या धक्काधक्कीच्या व स्पर्धात्मक युगात मानसिक स्वास्थ्य टिकविणे खूप गरजेचे झाले आहे. मन प्रसन्न आणि शांत असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहू शकतो. तसेच शासकीय कामकाज करतानाही ताणतणावाचा सामना अनेकांना करावा लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये सकारात्मकता आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी राजयोग हे अति आवश्यक आहे. तसेच  ब्रह्माकुमारी अरुणा दीदीनी उपस्थितांना राजयोगाची परिपूर्ण माहिती  प्रोजेक्टरद्वारे देऊन राजयोग मेडीटेशन करण्याची विधीही सांगितली.

या उपक्रमाअंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक बळ वाढविणे हा प्रमुख उद्देश होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात ब्रह्माकुमारीज वैद्यकीय प्रभाग, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आयुष अधिकारी यांच्यासह, आयुष अधिकारी, ब्रह्माकुमारीज वैद्यकीय प्रभागाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. डॉ. उमेश तागडे, सह संचालक (आयुष) राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई आणि ब्रह्माकुमारीज वैद्यकीय प्रभागाचे डॉ. सचिन परब, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस सहायक प्रशासकीय अधिकारी मनोज लोखंडे, कृषि विस्तार अधिकारी श्री. गाडे, तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. जी.डी.कोटकर, ब्रह्माकुमारी अनिता दीदीजी, यशोदादीदी,वर्षादीदी, विश्वनाथ शिंदे भाईजी , शारदा भट्ट, श्रीमती वर्षा शिंदे, माजी सभापती सुलोचना देशमुख, श्रीमती इंदु देशमुख, तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY