कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीने पार पडला शिवजन्मोत्सव सोहळा

0
680

प्रतिनिधी / कोल्हापूर – राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोल्हापूरमध्येही आज टाऊन हॉल परिसरात असलेल्या नर्सरी बागेतील शिवमंदिरात छत्रपती घराण्यामार्फत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने छत्रपती घराण्याचे स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर येथील नर्सरी बागेत शिवरायांचे मंदिर आहे. कोल्हापुरातील टाऊन हॉल शेजारील नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराजांनी शिवरायांचे अत्यंत देखणे मंदिर बांधले आहे. काळ्या दगडात बांधकाम केलेले हे मंदिर दुमजली आहे. संस्थान काळात येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात होती. शिवजयंतीच्या दिवशी शाही लवाजम्यासह शिवरायांची पालखी निघत असे. पालखीला राजर्षी शाहू महाराज स्वतः खांदा देत. या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. आजही ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे.

आज सकाळी १० वाजता मालोजीराजे छत्रपती आणि यौवराज यशराज हे शाही लवाजम्यासह नर्सरी बागेतील या शिवमंदिर येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित सर्वांनी छत्रपती घराण्याचे स्वागत केले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी स्थानिकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY