विवाहबाह्य संबंधातून तरुणीची हत्या

0
743

मुंबई / प्रतिनिधी – प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना माणगाव शिरसाड येथे घडली. आश्चर्य म्हणजे आरोपीने हत्येच्या दोन दिवस आधीच मृतदेह पुरण्याची व्यवस्था करुन ठेवल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या घटनेचा सुगावा लागल्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आले आहे. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

एक तरुण महिला बेपत्ता असल्याची तक्रार १६ नोव्हेंबरला मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मैत्रीणीच्या लग्नाला जाते म्हणून गेलेली रोहिणी घोरपडे (वय २८) ही तरुणी घरी परतलीच नव्हती. त्यामुळे तिच्या भावाने तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचा माग घेतल्यानंतर त्यांना याचा सुगावा लागला. माणगाव शिरसाड येथे मृतदेह पुरण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर डोक्याला मार लागल्याचे त्यात आढळून आले. त्यानंतर, तपासाअंती आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलीस यशस्वी झाले.
रोहिणी घोरपडे ही मानखुर्द येथील रहिवासी होती. वाशी येथे महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी नोकर होती. त्याच ठिकाणी राहणाऱ्या सुनील शिर्के (वय ४४) याच्याशी तिची ओळख झाली. सुनील हा विवाहीत असतानाही त्यांचे संबंध जुळून आले. त्यामुळे रोहिणीने सुनीलला महापालिकेतच काम मिळवून दिले. पण, रोहिणीने सुनीलकडे लग्न करण्याची मागणी केली. सुनील विवाहीत असल्याने त्याने नकार दिला. पण, रोहिणीने ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे रोहिणीला संपविण्याचा निर्णय सुनीलने घेतला.

एटीएम कार्डने लागला सुगावा-

१४ नोव्हेंबरला सुनीलने रोहिणीला त्याच्या गावी माणगावला नेले. या कामी विजयसिंह मोरे याने सुनीलला मदत केली. तिथे गेल्यावर रोहिणीच्या डोक्यात फावड्याने वार करुन मारण्यात आले. नंतर तिच्याच साडीने तिचा गळा आवळण्यात आला. तिच्यासाठी आधीच खोदून ठेवलेल्या खड्ड्यात मीठ टाकून तिला पुरण्यात आले.

माणगावला जाण्याआधी सुनीलने रोहिणीच्या बँक खात्यातून बऱ्याच वेळा पैसे काढले होते. तिचे एटीएम कार्ड त्याच्याकडेच होते. यामुळे पोलिसांना सुनीलचा संशय आला. अधीक तपास केल्यानंतर सुनील दोषी आढळला. या तपासात सहाय्यक पोलीस आयुक्त ट्रॉम्बे यांच्यासह बजरंग बनसोडे, नितीन बोबडे यांनी महत्वाची भूमिका निभावली.

LEAVE A REPLY