औषधांच्या ओव्हरडोसने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

0
383

मुंबई / प्रतिनिधी – डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं बाळंतपणासाठी आलेल्या महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. इंजेक्शनचा ओव्हरडोस दिल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. भिवंडीतल्या फ्रँक रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. कांचन प्रदीप गुप्ता (वय, ३१ रा. कासार आळी) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे इंजेक्शनचा ओव्हरडोस दिल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मृत कांचन नऊ महिन्यांची गरोदर असल्याने तिला प्रसूतीसाठी भिवंडीतील फुलेनगर येथील खदान रोडवरील फ्रँक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिची प्रसूती सुरळीत व्हावी यासाठी प्रथम तिला एक इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर लागोपाठ आणखीन दोन इंजेक्शन दिले. त्यामुळे इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्याने कांचन अचानक बेशुद्ध होवून गतप्राण झाली. मृत कांचनच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी डॉक्टर व नर्सकडे विचारणा केली असता रक्तात दोष निर्माण झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी कांचनची योग्य ती काळजी न घेता तिला इंजेक्शनचा ओव्हरडोस दिल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कांचनचे पती प्रविण गुप्ता यांनी केला असून दोषी डॉक्टरांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY