महाराष्ट्रात डान्सबारचा मार्ग पुन्हा मोकळा

0
68

वृत्तसंस्था / नवी दिल्ली – महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे डान्स बार चालक आणि बारबालांना मोठा दिलासा मिळाला. बारबालांना गुणगौरव म्हणून टीप न देण्याची राज्य सरकारची अट रद्द करण्यात आली आहे. तर सीसीटीव्ही लावण्याचा नियमही शिथिल करण्यात आला आहे. आता संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत महाराष्ट्रात डान्स बार सुरु राहणार आहेत. यामुळे बारबालांना पुन्हा रोजगार मिळण्याची आशा याचिकाकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने उगारलेल्या छडीची नको, तर घुंगरांची छमछम व्हावी, यासाठी डान्सबार चालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात डान्सबार चालकांनी केलेल्या याचिकेवरील निर्णय यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता.
महाराष्ट्र सरकारने कायदे इतके कडक केले आहेत, की आम्हाला डान्स बारचा परवानाच मिळू दिला नाही, असा आरोप डान्स बार चालकांनी केला होता. या कायद्यामुळे महिलांचं शोषण आणि इतर गैरप्रकार रोखले जात आहेत, असा दावा सरकारने केला होता. सुप्रीम कोर्टाने डान्सबारला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने काही ‘संस्कारी’ अटी आणि शर्थी घातल्या होत्या.

2005 साली डान्सबार बंदी

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून 2005 साली डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. याविरोधात बार मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने डान्स सुरु ठेवण्याचा निर्णय दिला होता. राज्य शासनाने याविरोधात पोलिस कायद्यात बदल केला. मात्र 16 जुलै 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील बंदी उठवली होती.
ही बंदी उठवल्यानंतर तेव्हा पुन्हा एकदा याबाबत नवा कायदा लागू करण्यात आला होता. ज्यामध्ये मागील कायद्यातील त्रुटी काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा ही बंदी 15 ऑक्टोबर 2015 रोजी घातली होती.

 

LEAVE A REPLY