वेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला – भागवत

0
330

प्रतिनिधी / नागपूर – सत्तर वर्षांमध्ये देशात काहीच झालं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम सांगत असतात. भाजप ज्या परिवाराचा सदस्य आहे त्या संघ परिवाराचे प्रमुख मोहन भागवत यांनी मात्र पंतप्रधान मोदींपेक्षा वेगळं मत व्यक्त केलं. देश गेल्या 70 वर्षांमध्ये पुढे गेलाय. काहीच झालं नाही असं नाही. मात्र त्याचा वेग कमी आहे असं त्यांनी गुरुवारी सांगितलं. प्रहार सैनिकी शाळेच्या रजत महोत्सवी कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या आधीही काँग्रेस मुक्त घोषणेवरूनही त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं होतं.

आपल्या भाषणात भागवत म्हणाले, “70 वर्षात देश पूढे गेलाय, 70 वर्षात देशाने काहीच केले नाही असं नाही, मात्र वेग कमी आहे, जपान आणि इस्रायल हे छोटे देश पुढे गेले, मात्र आज ते कुठे आहेत आणि आपला देश कुठे आहे? आजही आपला देश काय आहे? एकसंघ आहे का असा प्रश्न पडतो. देशाचे तुकडे व्हावे असा विचार करणाऱ्यांचे समर्थक आजही देशात आहे.”

ते पुढं म्हणाले “देशासाठी मरणे आणि जगणे शिकले पाहिजे, महागाई, बेरोजगारी वाढली ती मी आणि तुम्ही वाढवली नाही   तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो.”या आधीही दिल्लीत व्याख्यान देताना ‘मुक्त’चा नारा हा राजकारणात चालतो संघात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. संघ कुणालाही मुक्त करण्याची भाषा करत नाही तर सर्वांना युक्त करण्याचं काम करतो असंही ते म्हणाले होते. त्यामुळे भाजपला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. काँग्रेस मुक्त म्हणजे काँग्रेसपासून मुक्ती नाही तर काँग्रेस संस्कृतीपासून मुक्ती भाजपला अपेक्षीत आहे असं भाजपने स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY