मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी; परिसरात दहशत

0
353

प्रतिनिधी / नाशिक – शहरातील काही भागात मोकाट जनावरांची मोठी दहशत आहे. आज एकाच दिवशी सिडको भागात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात २ जण जखमी झाले. या हल्ल्यामध्ये सिडको भागात एका ७ वर्षाच्या बालकाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. दुसऱ्या घटनेत एका वयोवृद्ध महिलेवर मोकाट जनावराने हल्ला केल्याने ती महिला देखील गंभीर जखमी झाली आहे.

नाशिकच्या सिडको भागातील साईबाबा नगर येथून आपल्या आईसोबत पायी शाळेत जात असलेल्या एका ७ वर्षाच्या बालकावर १७ ते १८ गाईंच्या कळपाने हल्ला चढवला. या घटनेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारा महेश पवार हा बालक गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर, डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला असून एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात महेशवर उपचार सुरु आहेत.

महेशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार पुढील ७२ तास त्याच्यावर लक्ष ठेवावे लागणार असून हे तास त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. ही घटना ताजी असतानाच याच परिसरात महाकाली चौकामध्ये देवीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या सीताबाई ठाकरे या ७० वर्षीय वृद्ध महिलेवरदेखील मोकाट गाईने हल्ला केला. यात त्यांच्या पायाला आणि हाताला गंभीर इजा झाली. महापालिकेने या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जखमींच्या नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY