किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी; ६ जण जखमी, दुचाक्याही जाळल्या

0
375

प्रतिनिधी / अहमदनगर- शहरातील वंजारगल्ली परिसरात किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला आहे. लहान मुलाला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून कोठला व वंजारगल्ली परिसरातील दोन गटात वाद सुरू झाला. मात्र, क्षणातच या किरकोळ वादाचे हाणामारी व जाळपोळीत रुपांतर झाले. यात दोन्ही गटातील एकूण सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

तन्वीर बशीर पठाण (वय ३३, कोठला), फरदीन तनवीर सय्यद (वय १८, कोठला), साबीर सादीक सय्यद (वय १९, कोठला), वैभव संजय होंडे (वय ३०, वंजारगल्ली), रोहत वसंत फंड (वय २८,वंजारगल्ली), अझरुद्दीन नुरमहंमद शेख (वय २२, कोठला) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वंजारगल्ली भागात दुपारच्या सुमाराला लहान मुलांचा गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. वाद वाढल्याने आजुबाजूच्या परिसरातील नागरिक जमा झाले. दरम्यान, जमाव वाढल्यानंतर या दोन्ही गटात हाणामारीला सुरुवात झाली, तर काहीजणांनी दगडफेकही केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे वंजारगल्ली व आडतेबाजारातील व्यापार्‍यांनी त्यांची दुकाने तात्काळ बंद केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जमावाने दोन दुचाकींना आग लावली होती. घटनास्थळी अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत गाड्या जळून खाक झाल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह त्यांचा फौजफाटा तात्काळ वंजारगल्ली दाखल झाला. पोलीस येताच घटनास्थळावरील जमाव पांगला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. परिसरात तणाव असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेजद्वारे पोलिसांनी दोषींचा शोध सुरू केला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. लहान मुलांच्या किरकोळ वादातून हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY