विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते मौनीबाबा झाले – वामनराव चटप

0
340

प्रतिनिधी / अकोला – भाजपने २०१४ च्या निवडणुकीत वेगळा विदर्भ अभिवचन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भासाठी खामगाव ते अनुभव यात्रा काढली. नितीन गडकरींनी लेखी स्वरुपात लिहून दिले. विदर्भातील मागील निवडणूक ही भाजपने विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढली. मात्र, साडेचार वर्षात आता भाजपचे नेते मौनीबाबा झाले आहेत. विदर्भाबाबत बोलतच नाहीत, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी केला आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या विदर्भ निर्माण यात्रेच्यानिमित्त चटप अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हणून वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. निवडणुकीच्या वेळी आम्हाला निवडून द्या, आम्ही वेगळा विदर्भ देऊ, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू, विजेचे बिल माफ करू, शेतीमालाला उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू अशी भाजपने आश्वासने दिली होती. यापैकी ५ वर्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर पुन्हा खोटे बोलून २०१९ च्या अगोदर मते मागायला हेच भाजप नेते येणार आहे. तेव्हा हे सर्व प्रश्न जनतेने भाजपला विचारले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप सरकारला ५ राज्यातील जनतेने जसा धडा शिकविला तसाच वैदर्भीय जनतेनेही आगामी निवडणुकीत आंदोलन समजून धडा शिकवावा, असेही वामनराव चटप म्हणाले. विदर्भातील ९ विदर्भवादी पक्ष व विदर्भवादी संघटना स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यासाठी त्याचप्रमाणे येत्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका लढण्यासाठी एकत्र येऊन विदर्भ निर्माण महामंचची स्थापना केली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, आम आदमी पक्ष, बच्चू कडू यांचे प्रहार जनशक्ती पक्ष, बी. आर. एस. पी. (सुरेश माने), रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे), राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष आदी पक्ष सहभागी आहेत. तसेच यापुढील सर्व निवडणुका हा विदर्भ निर्माण महामंच लढविणार आहे. विदर्भात तिसरा पर्याय हा महामंच देणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे हे सर्व पक्ष विदर्भद्रोही आहेत, असा घणाघात आरोपही वामनराव चटप यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY